' एक स्मरण संस्थापक कार्यकर्त्यांचे ! '   


कोणत्याही गावाला , शहराला मिळालेला एक विशिष्ट चेहरा असतो तर काहींच्या बाबतीत तर तो एक सांस्कृतिक वारसा असतो. मुंबईतील पारले गावाला गेली कित्येक वर्षांपासून लाभलेला सांस्कृतिक चेहऱ्याचा वारसा म्हणजे एक प्रकारे दोन्हींचा सुरेख मिलाफ होय.  

पारले गावाला मिळालेले आजचे वलय हे मुख्यत्वे सर्वात आधी दोन सांस्कृतिक वारशांमुळे लाभले आहे. पैकी पहिला वारसा म्हणजे पार्ले टिळक विद्यालय राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षण देणारी शाळा तर दुसरा वारसा म्हणजे लोकमान्य सेवा संघ ही लोकाभिमुख सामाजिक कार्य करणारी संस्था. 

पारतंत्र्याच्या काळात पारले टिळक विद्यालय ही राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षण देणारी शाळा ६ जून १९२१ या दिवशी स्थापन झाली आणि पाहता पाहता नुकताच गेल्या वर्षी या शाळेचा शताब्दी महोत्सव पार पडला. 

शिक्षण संस्थेच्या बरोबरीने सामाजिक कार्य करणारी सेवाभावी संस्था आपल्या गावात असावी या विचाराने ११ मार्च १९२३ या दिवशी लोकमान्य सेवा संघाची स्थापना झाली. बघता बघता आजच्या ११ मार्च २०२२ दिवशी संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष कधी येऊन ठेपले ते समजले नाही. 

भारतीय स्वराज्याचा भारून टाकणारा तेजोमय मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांचे १ ऑगस्ट १९२० या दिवशी झालेले निधन म्हणजे साऱ्या भारत देशाला अत्यंत शोकाकुल करून टाकणारी भावना होती. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी तर कर्ता पुरुष जाण्यासारखी शोककळा पसरली होती.एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये गावागावांमधून शिक्षण, नोकरी आणि कामधंद्याच्या शोधात काही कर्ती सवरती मंडळी मुंबईत येऊन स्थायिक झाली. त्यातील काही धोरणी धडपड्या मंडळींनी मुंबई शहरापासून तासाभराच्या अंतरावर लांब पारले नामक कोकणी साधेपणाची छाप असणाऱ्या गावात का होईना पण गावाला असते तसे स्वतःचे टुमदार घरदार , वाडी असावी या विचारांतून पारले नामक कोंकणी साधेपणाची छाप असणाऱ्या गावात आपली घरे बांधली. तेव्हा पारले हे अगदी साधे ग्रामपंचायतवजा इटुकले गाव होते आणि मुंबईचे उपनगर म्हणून असणारी आजचे विलेपार्ले ही ओळख खूप नंतरच्या काळात झाली    

काळाच्या ओघात गावातील आपल्या भावी पिढीची एक वाढती गरज म्हणून एक शिक्षण संस्था आणि त्या जोडीने समाजासाठी आधुनिक लोकशिक्षणाचे जागृत कार्य करणारी एक सामाजिक संस्था असावी असा सामायिक विचारांचा ओघ एकसमयावच्छेदे सुरु झाला. 

यातून कारकुनी पेशामधील काही कर्त्या मंडळींनी लोकमान्यांच्या निधनानंतर त्यांचे पुण्यस्मरण करून टिळक मंदिर नामक गावची एक सामाजिक संस्था उभी करण्याचा संकल्प सोडला. वामन हेर्लेकर , बळवंत फणसळकर मास्तर , त्रिंबक गुळवणे , अलूरकर , श्रीधर सहस्रबुद्धे , दत्तात्रय पातकर , सदाशिव देशपांडे , पुरुषोत्त्तम जोशी , जगन्नाथ सोमण ,  दामोदर केळकर ही सगळी एकाच ध्येयाने प्रेरित झालेली निष्ठावान कार्यकर्ते मंडळी एकत्र जमली. स्वतःच्या श्रमदानातून त्यांनी लोकमान्य सेवा सेवा संघाची म्हणजे टिळक मंदिराची वास्तू उभारली. श्रमदानाने पाया खणत , सामाजिक कार्याच्या सोडलेल्या संकल्पातून श्रद्धेची एकेक वीट उभारत एका छोटेखानी एकमजली कौलारु इमारतीची देखणी वस्तू जन्माला आली.आता बघता बघता ९९ वर्षे पूर्ण होऊन शतक महोत्सवी वर्षामध्ये या संस्थेचे दिमाखदार पदार्पण झाले आहे. 

संत रामदास स्वामी , छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक ही त्रिमूर्ती म्हणजे संस्थेची एक स्फूर्तिदेवता आहे. ' तव स्मरण स्फुरणदायी सतत आम्हां घडो ' आणि सेवा करावया लावा , देवा हा योग्य चाकर अशी संस्थेची चिरंतन बोधवचने आहेत. पंजाब केसरी लाला लजपतराय , श्रीमद्जगद्गुरू शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी , साहित्यसम्राट न. चिं. केळकर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर , नेताजी सुभाषचंद्र बोस , सरदार वल्लभभाई पटेल , महर्षी धोंडो केशव कर्वे , बॅरिस्टर महंमदअली छगला , मोतीलाल नेहरू , जवाहरलाल नेहरू , डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी , डॉ, बाबासाहेब आंबेडकर , मोरारजी देसाई , आचार्य प्रल्हाद केशव अत्रे , अटलबिहारी वाजपेयी , बाळासाहेब ठाकरे ते अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कित्येक थोर  व्यक्तींनी या वास्तूला आवर्जून भेट दिली आहे. पैकी अटलबिहारी वाजपेयींच्या हस्ते १९७१ साली संस्थेच्या सुवर्णमहोत्सवाचा शुभारंभ झाला होता. 

लोकमान्य सेवा संघाच्या वास्तूजवळ अगदी हाकेच्या अंतरावर महात्मा गांधी , नेताजी सुभाषचंद्र बोस आणि  मोतीलाल नेहरू यांची आदराने नावे दिलेले मोठे रस्ते आहेत. गंमतीचा म्हणा की योगयोगाचा भाग म्हणा की तो असा , या रस्त्यांवरून येणारा नागरिक लोकमान्य सेवा संघ म्हणजे टिळक मंदिरात व स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगणात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पोहोचतो. 

मात्र कोणत्याही विशिष्ट राजकीय तसेच सनातन धार्मिक विचारांशी अजिबात जुळवून न घेता लोकोत्तर बौद्धिक शिक्षणासाठी , उन्नत प्रगतीसाठी , समाजोपयोगी विचारांसाठी नेटाने कार्य करणारी ही सामाजिक संस्था आहे. ' साधनानाम अनेकता ' या वचनाप्रमाणे काळाच्या गरजेनुसार आज २२ वेगवेगळ्या शाखांमध्ये आणि तीन वास्तूंमध्ये ही संस्था प्रगत होत वाढती राहिली आहे.नागरिक दक्षता शाखा असो , ग्रंथालय असो, व्यायामशाळा असो , वृद्धाश्रम असो , गुंतवणूक तसेच वैद्यकीय शाखा असो की कर्णबधिर तसेच मतिमंद मुलांची शाळा असो की डॉ. कलबाग जयपूर फूट सेंटर असो, भोवतालच्या समाजाचा साकल्याने विचार करत बदलत्या काळानुसार आपल्यातही साक्षेपी परिवर्तन करवून घेत नवनवीन शाखांचा समावेश करणारी अशी ही लोकविलक्षण सामाजिक संस्था आहे. 

१८ वर्षांखालील नवयुवकांना सामावून कार्यानुभव देण्यासाठी युवामंच शाखा सुरु झाली. एवढेच नव्हे तर ब्रिज खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता एक स्वतंत्र ब्रिज शाखा देखील गेली काही वर्षे सुरु आहे. अलीकडे काही वर्षे देहदान तसेच अवयवदानाचे महत्व समजावून देणारी अत्यंत योग्य आणि उपयुक्त माहिती दिली जाते. 

संस्थेमध्ये श्री गणेशोत्सवासारखे महत्वाचे पारंपरिक हिंदू सण उत्साहात साजरे होतात. जसे संत साहित्य , कीर्तन , धर्मशास्त्र , विज्ञानशास्त्रावरील कार्यक्रम होतात ,तसेच  समाजातील गरजू विवंचितांसाठी जाणीवपूर्वक सढळ मदतीचा हात देणारे ' देणे समाजाचे ' यासारखे कार्यक्रम होतात. 

माझ्या बाबतीत म्हणाल तर सांस्कृतिक जीवनातील कितीतरी संस्मरणीय क्षण या वास्तूमध्ये अतिशय आनंदात गेले आहेत. संगीत , साहित्य , व्याख्याने , मुख्य म्हणजे मॅजेस्टिक गप्पा आणि कला क्षेत्रातील विविधतेने नटलेल्या अनेकानेक सांस्कृतिक  कार्यक्रमांमुळे हे तृप्तीचे अलोट क्षण लाभले आहेत. 

कला, संगीत , नाटक . चित्रपट , शास्त्र , विद्या आदी विविध क्षेत्रांमध्ये मुंबईतील पार्ले उपनगराने अनेक नामवंत व्यक्ती दिल्या आहेत. भारतीय सेनादलात कार्यरत राहून देशासाठी काही पार्लेकरांनी आपले हौतात्म्याचे योगदान दिले आहे. या सर्वांच्या देशाभिमानी तसेच सांस्कृतिक जीवनाचा समृद्ध पाया पार्ल्यातील विविध संस्थांमधून घडवला गेला आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे हे याचे मोठे बोलके उदाहरण आहे. जीवनात लाभलेले सर्व प्रतिष्ठित पुरस्कार , सन्मानचिन्हे , मानपत्रे , छायाचित्रांचा संग्रह आपल्या पश्चात जतन करण्यासाठी पु लं नी त्यांचे बालपण आणि तरुणपण ज्या संस्थेच्या सान्निध्यात गेले त्या लोकमान्य सेवा संघाची निवड केली. यातून १९९३ साली ' पु. ल. गौरव दर्शन संग्रहालय ' मोठ्या दिमाखात उभे राहिले. 

विलेपार्ल्यात अनेक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या संस्था १९६० नंतरच्या दशकांत निर्माण झाल्या. विलेपार्ल्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या लोकाभिमुख संस्थेचे पहिले रोपटे सर्वात आधी लोकमान्य सेवा संघ पारलेने १९२३ साली रोवले आणि आज त्याचा केवढा भला मोठा वटवृक्ष विस्तारला आहे. विस्तारलेल्या वटवृक्षाच्या विशाल फांद्यांच्या छायेत निर्माण झालेल्या अनेकानेक सामाजिक संस्था तसेच शिक्षण संस्थांमधून भावी सुजाण ,सुसंकृत पार्लेकर नागरिक घडत आहेत. 

लोकमान्य सेवा संघाचे रोपटे रुजवणाऱ्या पहिल्या संस्थापक कार्यकर्त्या मंडळींचे स्मरण आजच्या दिवशी प्रत्येक पार्लेकर नागरिकाने जाणीवपूर्वक करावयास हवे. यासाठी लोकमान्य सेवा संघाचा सभासद कार्यकर्ता आणि कलाकार या दुहेरी नात्याने एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन स्वतंत्र चित्रांकने रेखाटण्याचा एक विचार माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून घोळत होता. 

पहिले म्हणजे दि. ११ मार्च १९२३ या दिवशी संस्थेची स्थापना करून श्रमदानाने वास्तूची पायाभरणी करणाऱ्या संस्थापक कार्यकर्त्यांचे आणि दुसरे म्हणजे या संस्थापक कार्यक्रत्यांसमवेत १९२४ साली पूर्ण झालेली संस्थेची पहिली वहिली वास्तू. 

तो विचार आज पूर्ण झाला. 

लोकमान्य सेवा संघ - टिळक मंदिर या संस्थेला शतक महोत्सवी वर्षाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा ! 

@ श्री. अनीश दाते , 

शुक्रवार , दि. ११ मार्च २०२२

भ्रमणध्वनी : ९३२४६२३६३०

dateaneesh@gmail.com


Comments

Popular Posts